सध्याची पिढी अशक्त होण्याचे कारण आपले सध्याचे आहार तर नाही ना?

       

        आपल्या देशात मंगळवारी , २० डिसेंबरच्या दुपारी संसद भवनाच्या भोजनालयात स्वादिष्ट भोजनाचा एक वेगळाच घमघमाट पसरला होता.पण, या वेळी तो नेहमीपेक्षा वेगळाच होता . कारण त्या दिवशीचे सारे पदार्थ भरड धान्यांपासून तयार केले होते . या खास मेजवानीचे आयोजन कृषी मंत्रालयाने केले होते आणि त्यासाठी निमित्त होते , संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे ' भरड धान्य वर्ष ' म्हणून जाहीर केल्याचे ! एरवी ' गरिबांचे अन्न ' मानले जाणाऱ्या भरड धान्यांचा येत्या वर्षात देशभरात प्रचार प्रसार व्हावा , लोकांनी रोजच्या आहारासाठी या धान्याकडे वळावे म्हणून सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत . संसद भवनात झालेला भोजनाचा कार्यक्रम हा त्याचा प्रारंभ होता . पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री , विरोधी पक्षांचे नेते आणि दोन्ही सभागृहांतील खासदारांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला . पण आता ' जेवण झाले , हात धुतले अन् यजमानाबरोबर पाहुणेही कामाची गोष्ट विसरले ' असे व्हायला नको . त्यासाठी प्रत्येक खासदाराने येत्या वर्षात भरड धान्याच्या उत्पादनवाढीसाठी कृतिशील पुढाकार घेतला पाहिजे . आपल्या मतदारसंघात सध्या भरड धान्याखाली किती पेरा आहे , याची नोंद घेऊन स्वतःच्या प्रयत्नांतून आगामी भरड धान्य वर्षामध्ये त्यात किती भर पडेल , याचा लेखाजोखा केंद्राकडे दिला तरी हे वर्ष खऱ्या अर्थाने साजरे झाले , असे म्हणता येईल .



        भरड धान्य म्हणजे तृणधान्यच . हरित क्रांतीपूर्वी १ ९६०-६५ च्या दशकापर्यंत भारतीय लोकांचा हाच तर मुख्य पौष्टिक आणि आरोग्यदायी आहार होता . प्रत्येकाच्या शिवारात ज्वारी , बाजरी , मका , भगर , नाचणी , सातू , मका , राळे , राजगिरा या पारंपरिक पिकांची श्रीमंती गौरवाने डोलत असे . घराच्या बाहेर असणाऱ्या उकिरड्यावरील सेंद्रिय खत तसेच शेतातील गोठ्यामधील खतावर ही पिके खरीप - रब्बीमध्ये तरारूनं यायची . खरिपात नियमित पडणाऱ्या पावसाचे पाणी त्यांना पुरेसे असायचे , तर रब्बीच्या ओलाव्यावर ती आणखी बहरायची . बाजरीची एक गरम भाकरी आणि घरचे लोणी अथवा ताजे ताक , दही या आहारातून आपली थंडीतील कडाक्याची भूकही शमत असे . ही सर्व भरड धान्ये माणसाच्या आरोग्याबरोबरच जमिनीच्या आरोग्यासाठीही उत्तम होती . १९६०-६५ या काळापर्यंत कुठे होता मधुमेह , रक्तदाब , हृदयविकार आणि कर्करोग ? ही सगळी भरड धान्येच तर आमचे खरे आरोग्य रक्षक होती . ६५ च्या सुमारास भारतात हरितक्रांती झाली आणि संकरित गहू , भात या पिकांनी रासायनिक खते खाऊन , भूगर्भातील पाण्याला ४०० फुटांपेक्षाही जास्त खोल तळ दाखवत , लहान - मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतातून अधिक उत्पन्नाच्या हव्यासापोटी भरड धान्यांना टप्प्याटप्प्याने हद्दपार केले . कुणा एखाद्याने प्रेमापोटी ज्वारी , बाजरी लावली , तर शेजारच्या बांधावरील शेतकरी त्याची कुचेष्टा करत , इथपर्यंत शेती आणि पीक पद्धतीत बदल होत गेले .

        पारंपरिक भरड धान्यांना हद्दपार करून संकरित वाणांबरोबरच विविध शारीरिक आजारांना आमंत्रित करण्यामध्ये शासनाचा कृषी विभाग जेवढा जबाबदार राहिला तेवढाच शेतकरीसुद्धा . आज आपला देश मधुमेहाची राजधानी बनतो आहे . रक्तदाब , हृदयविकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . एकेकाळी आपले पंजाब भरड धान्याचे कोठार होते . आज ते फक्त कर्बयुक्त , सत्त्वहीन गहू , तांदळाने भरलेले आहे . या राज्यातून पौष्टिक भरड धान्यांचे हद्दपार होणे आणि तिथूनच राजस्थानकडे प्रतिदिन रेल्वेची कॅन्सर एक्स्प्रेस सुरू होणे , हा विलक्षण योगायोग आहे . अमेरिकेत असताना तिथल्या मित्राबरोबर एका मॉलमध्ये जाण्याचा मला योग आला . त्याने आठ डॉलर ( आजचे ६४० रुपये ) देऊन तीन पिवळ्या भाकरी त्याच्या मधुमेह नियंत्रणासाठीचा आहार म्हणून घेतल्या . पाकिटावर लिहिले होते .. ' Yellow Bread , Made in India ' . आकर्षक वेष्टनामधील ती पिवळीची भाकरी होती , हे मी पाहताक्षणीच ओळखले होते . आमच्या देशातून हद्दपार झालेले हे भरड धान्य सोन्याच्या किमतीत अमेरिकेत विकले जात होते आणि आम्हाला मात्र तिचं मोल कळू नये , ही करंटेपणाची बोच मला अस्वस्थ करीत होती . या धान्यांना हा मान आपल्या मायभूमीत का मिळू नये , असे वाटत राहिले .



        केंद्र सरकारने २०२०-२१ मध्ये ज्वारी , बाजरी , नाचणी , मका आणि बार्ली या भरड धान्यांना आधारभूत किमतीत खरेदी केले . तब्बल तीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला . त्यांच्याकडून १२ लाख टन धान्य खरेदी करण्यात आले . आता येणाऱ्या २०२३ या भरड धान्य वर्षात शेतकऱ्यांची संख्या आणि त्यांनी उत्पादित केलेले धान्य दुप्पट व्हावे एवढीच अपेक्षा .' मिलेट मॅन ऑफ इंडिया ' अशी उपाधी लाभलेल्या डॉ . खादर वली यांनी पारगाव ( ता . दौंड ) येथील वसुधा सरदार यांच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला नुकतीच , १ ९ नोव्हेंबरला भेट दिली होती . त्या वेळी त्यांनी , ' देशातील गरीब , अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोयाबीन , कापूस , ऊस या पिकांपासून परावृत्त करून भरड धान्याची शेती करण्यास प्रोत्साहित करायला हवे , ' असे आवर्जून सांगितले . वास्तविक या थोर शास्त्रज्ञाच्या प्रयत्नातूनच आगामी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे होत आहे . जेमतेम ७५ दिवसांचे जीवनचक्र असणाऱ्या पिकांना आधारभूत किमतीपेक्षा दुप्पट किंमत देऊन खरेदी केले पाहिजे . त्यासाठी शासनाकडे पैसा कमी पडत असल्यास औद्योगिक क्षेत्राला सीएसआरअंतर्गत मदतीचे आवाहन करता येऊ शकेल .

       अन्य देशांच्या तुलनेत भारतात नागरिकांच्या आरोग्यावर सर्वात जास्त पैसा खर्च होतो . तो कमी करून सुदृढ भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी येणाऱ्या वर्षापासून भरड धान्याच्या सात्त्विक , पौष्टिक अन्नाचा आहारात प्राधान्याने समावेश करावा लागेल . आज भारतीयांच्या आहारात संकरित , कर्बयुक्त गहू , भात यांचे प्रमाण जास्त आहे . हे प्रमाण कमी करत भरड धान्य आपल्या मुख्य अन्नप्रवाहात येणे गरजेचे आहे . भरड धान्ये ग्लुटेनमुक्त आणि फायबरयुक्त असल्याने ती सर्वाधिक सकस , पोषक मानली जातात . आज ज्वारीची , बाजरीची , नाचणीची भाकरी खाण्यासाठी आम्हाला दूर कुठल्या तरी ढाब्यावर जावे लागते . लहान मुलांना तर या अन्नाची ओळखही होत नाही . संयुक्त राष्ट्रांमध्ये ७२ देशांच्या पाठिंब्यासह २०२३ हे ' भरड धान्य वर्ष ' म्हणून जागतिक स्तरावर साजरे करण्याचा प्रस्ताव भारताने मंजूर करुन घेतला . त्यामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांना या सर्व देशांबरोबर भरड धान्य निर्यातीचे संबंध स्थापन करण्याची उत्तम संधी अनायासे चालन आली आहे . आता कृषी मंत्रालयाबरोबरच वाणिज्य मंत्रालयानेही त्या दृष्टीने पुढाकार घ्यायला हवा . भरड धान्यांच्या उत्पादनामधून आत्मनिर्भर होत असतानाच आपण रासायनिक खतांचा वापर कमी करून कीटकांवर आणि कीटकनाशकांच्या अनावश्यक वापरावरही नियंत्रण तर ठेवू शकतो .




         हवामान बदलावरही भरड धान्ये हा प्रभावी उपाय आहे . पोषणमूल्य नसलेल्या अपुऱ्या आणि अयोग्य आहारामुळे आपल्या देशातील लहान मुले , महिला , स्तनदा माता तसेच गरोदर स्त्रियांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न उभे राहत आहेत . त्यामुळे अशा महिला आणि मुलांच्या आहारात भाजीपाल्यासह भरड धान्ये मुबलक असणे गरजेचे आहे . कोरोनाच्या काळात जेव्हा सर्व उद्योग - धंदे ठप्प होते , तेव्हा आपला शेतकरीच काम करीत होता . रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताज्या , पौष्टिक आहाराला महत्त्व आले त्या वेळी पहाटेच आपल्या दारात दूध , ताजी फळे , भाज्या येत होत्या . जो अविरत कष्ट करून ते दारापर्यंत पुरवत होता त्याच्याविषयी कृतज्ञतेचा भाव आपण बाळगायला हवा . फार्मा कंपन्या , औषध विक्रेते , रुग्णालये कोरोना काळात मालामाल झाले , पण दिवस - रात्र मेहनत करूनही आपला बळीराजा उपाशीच राहिला . त्याच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या भरड धान्याला आपण प्रसंगी अधिक किंमत देऊन खरेदी करायला काय हरकत आहे ? त्यामुळे शेतकऱ्यांना भरड धान्याचे उत्पादन घेण्यास प्रोत्साहन मिळेल . प्रत्येक कुटुंबाच्या आहारात भरड धान्याचा वापर वाढला , तर आपल्याबरोबरच जमिनीचे आरोग्यही टिकून राहील . त्यामुळे आगामी भरड धान्य वर्षापासून केंद्र - राज्य सरकार , कृषी विभागाच्या पुढाकाराने , शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने ' सुजलाम सुफलाम ' देशाकडे आपली वाटचाल सुरू व्हावी , अशी अपेक्षा करायला हरकत नाही . 

👉 डॉ नागेश टेकाळे

संकलन श्री सुनिल राठोड पदवीधर शिक्षक, 

Post a Comment

0 Comments