6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आजच्या पिढीने समजून घेताना.......



 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आजच्या पिढीने समजून घेताना.......


महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचे असे दुवे जे आजकालच्या पिढीला जाणून घेणे अत्यंत महत्वाचे बनले आहे. कारण सध्या तर असे दिसून येत आहे की यापुढे कोणत्याही व्यक्तीने इतिहासात होऊन गेलेल्या महान व प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या विचारांना समजू नये अथवा विचारांचा उदय भविष्यात पुन्हा एकदा होऊ नये, याची काळजी आत्ताच्या युगात अत्यंत पद्धतशीरपणे काही जागतिक शक्तीच्या माध्यमातून घेत असल्याचे जाणवते . परंतु  आजकालच्या पिढीला बाबासाहेबांचे योगदान आणि त्यांचे विचार यांचे महत्व समजून घ्यायला अडथळा करणारे आजकालचे सामाजिक वातावरणच जबाबदार आहे .

      तुम्ही आणि आम्ही आजकाल मोबाईल इंटरनेट सारख्या डिजिटल जेलखान्यातून बाहेर यायचे कोणीही धाडस करत नाही. दिवसभरातले 24 तासांपैकी 6 तास झोपेला , सकाळ विधी, तयार होणे, चहा नाष्टा, दोन वेळेसचे जेवण याला 4 तास, रोजच्या कामाला नोकरी असेल कामगार असेल किंवा इतर कोणतेही काम असेल त्याला 7 तास व उरलेल्या सरासरी 7 तास मोबाईल स्क्रिन वर जर घालवत  असू तर महामानवाच्या विचारांचा उदय होईलच कसे? व पुन्हा नवीन क्रांती होईलच कशी?      

         आपण  हल्लीच्या मोबाईल, इंटरनेट, गेम्स व एप्स असेल यांच्या जाळ्यात असे अडकलो आहोत की त्यातून स्वतःला सुटका करून घेणे तर सोडाच पण त्यातून बाहेर पडण्याचे सुद्धा प्रयत्न आपल्यातून दिसून येत नाही. उलट अशा अजगरांचा फास दिवसेंदिवस आणखीनच जास्त आवळत चाललेला दिसत आहे. आणि आपण यांच्या  अभासी विश्वाच्या मोहात  स्वतःला मोबाईल मध्ये कैद करून घेऊन आपल्या महत्वाचे सात ते आठ तास जर असेच घालवत असू तर , बाबासाहेबांचे विचार व कार्य यांचे अंमल तर सोडाच , आपण स्वतःला सुद्धा विसरत चाललो आहोत. आपण जर बाबासाहेबांच्या विचाराचे 5 टक्के जरी अंमल केलं तरी खूप महान कार्य आपल्या हातून घडेल. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

        सध्या आपणात आणि यंत्र मानवत काहीच फरक राहिला नाही. बाबासाहेबांचे विचार पाजळणे तर सोडाच त्यांना समजून घ्यायलाही अवघड जाईल हे आजकालच्या नेटिझन्सनी समजून घ्यायला पाहिजे. बाबसाहेबांसारखे तर या युगात कोणीही बनू शकणार नाही कारण त्याचे कारणही असेच आहे जे तुमच्या आमच्या समोर एक यक्षप्रश्न म्हणून उदयास आलेला आहे ते हे की आपण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगाला असे काही चिटकून बसलो आहोत जणू मधमाशी पोळ्याला. कधी कधी तर असे वाटते की आपणास मुद्दामच टाइम पास करण्यासाठी आणि आपला महत्वाचा वेळ मारून नेण्यासाठी तर हे चालू नाही ना? आणि आपण आजकाल एका आदेशीत रोबोट्स सारखे वागत आहोत असे वाटत नाही का ?. आपले विचार आपले भाव भावना या मरून जात आहेत की मारून टाकत आहेत हे ही आपल्याला माहीत नाही.

      आजच्या तंत्रज्ञानाने तर लेखन व वाचन संस्कृतीचे अक्षरशः अमानुष खून केल्याचे दिसत आहे. लेखनाची जागा स्वयंचलित टायपिंग ने तर वाचनाची जागा कुकु सारख्या एप्स नी जे कोणत्याही पुस्तकाला वाचन तर सोडाच आता केवळ ऐकणे एवढंच आहे. वाचन व लेखन संस्कृती आजच्या तंत्रज्ञानाने वेगाने गिळंकृत करत असल्याचे  दिसत आहे.

     डॉ बाबासाहेबांनी तर आपल्या दिवसाच्या 24 तासांपैकी 18 तास नुसते वाचन,  मनन , चिंतन व लेखन यामध्ये घालवले आहेत. म्हणजेच त्यांनी त्यांचा अख्या जीवनाचे  जवळपास 75 टक्के आयुष्य हे  केवळ त्यांनी अभ्यासासाठी खर्ची घातलेला आहे. अजूनही त्यांच्यासारखा महान विचारवंत व मल्टी टायलेंटेड व्यक्तिमत्व उदयास येणार की नाही हे कोणीही सांगू शकणार नाही. पण आज आपला भारत देश ज्या पायांवर मजबुतीने उभा आहे त्याचे खरे श्रेय बाबासाहेबाना जाते .

        एक उत्कृष्ट इंजिनिअर ज्या प्रमाणे सुंदर आणि मजबूत अशी इमारत तयार करून उभारतो जे ती वर्षानुवर्षे टिकते असेच बाबसाहेबांनी  जगातील सर्वात मोठी भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी सर्व भारतीयांच्या झोळ्यात एक सुदर आयुष्य जगण्यासाठी दिलेले लाईफ टाइम उपहारच आहे, हे आजच्या पिढीनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्या साहित्याचे वाचन करायला हवे.कारण जागतिक स्तरावर 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' चे टॅग  मिळवणारा एकमेव व अद्वितीय कोहिनुर हिरा हा भारताच्या खाणीतील आहे. हा अभिमान सर्वच भारतीयांना असला पाहिजे अशा महामानवाचा देहांत 6 डिसेंबर 1956 ला झाला . अशा महामानवाला माझा नमन व मानाचा मुजरा.


*लेख✍🏻सुनिल नरसिंग राठोड, 9763961999 . पदवीधर शिक्षक जि प प्रा शा बेरडवाडी ता उमरगा*

Post a Comment

0 Comments