भटकंती, स्वभावोक्ती अलंकार प्रस्तुत कविता कवी सुनिल नरसिंग राठोड, मुरूम

 



भटकंती 


जीर्ण झालेला वृद्ध मोकाट,

उदरभरणीसाठी होई सैराट.

त्याच्या छातीच्या हाडांचे सांगाडे,

सहज मोजता येईल ना गडे .


कमजोर देह सडपातळ बांधा,

पोटाचा आहे मोठा वांदा.

चालता येईना प्रयत्न खोटा,

तहानलेला तो हुडकी उरोटा .


देहदाहकता प्रचंड वाढली,

तहानेसह आता भुखही जडली.

शोधू लागला आसरा सावलीचा ,

मिळाला आधार त्याला झाडाचा.


झाडाखाली बसून एकवटी बल,

मनाला धीर देत म्हणे आता चल.

चोही बाजूंचे परिसर न्याहाळत,

दमला, भागला स्वतःला सांभाळत .


एक तुकडा सापडला अंगणात,

समाधानी मुद्रेने धावला क्षणात.

गाईला चारताना पडलेला उष्टा,

नियतीनं केली होती त्याची चेष्टा.


लाळेने जीभ त्याची लपापली,

पोटाची भूख होती हापापली.

भीतीची एक लहर सर्वांगात दडली,

झपकन काठी पायावर पडली.


बिचाऱ्याची पुन्हा भूखभंग झाली,

अर्धमेल्याची आता फजिती झाली.

वृद्ध, भूख ,तहान आणि मार,

या सर्वांचा झाला तो शिकार.


मुळापासून वेदनेने किंचाळत ,

धरणीवर विव्हळत लोळत .

ओरडुनी जोरात विलाप करती,

पुन्हा अन्नाच्या शोधात 'भटकंती'


                  


                     --सुनिल नरसिंग राठोड , मुरुम ,भटकंती ही कविता स्वभावोक्ती अलंकार प्रस्तुत कविता आहे कवी सुनिल नरसिंग राठोड, मुरूम द्वारा लिखित...


Post a Comment

0 Comments