5 सप्टेंबर शिक्षक दिन डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्याविषयी सखोल माहिती

      


   मित्रांनो एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पाच फूट अकरा इंच उंची, बारीक सडपातळ बांधा, गंभीर तेजस्वी मुद्रा, सोनेरी चौकटीचा चष्मा, त्यातून चमकणारे तेजस्वी तपकिरी रंगाचे डोळे, भव्य कपाळ, त्यावर दाक्षिणात्य पद्धतीचा पांढराशुभ्र टोकदार फेटा, तलम पांढरे पण काहीसे आखूड नेसलेले धोतर, त्यावर रेशमी कोट, संपूर्ण जगभरात विख्यात असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन होय .

अत्यंत बुद्धिमान आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, सुविख्यात भारतीय तत्त्वज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती, साधी राहणी उच्च विचारसरणी, अष्टपैलू जीवनाचे दर्शन घडविणारे एक आदर्श शिक्षक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट तत्त्वज्ञानी, उत्तम वक्ते, उत्तम प्रशासक, पारदर्शी व्यक्तित्व, थोर वेदांती पंडित, अशा थोर व्यक्तीचा परिचय करून घेणे यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी कोणतीही नाही.

तत्त्वज्ञानाच्या पायावर संस्कृतीची भव्य विशाल इमारत उभी असते. संस्कृतीचा आत्मा ” म्हणजे तत्त्वज्ञान.


नाव :डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
जन्म :५ सप्टेंबर १८८८
जन्मस्थान :दक्षिण भारतातील तिरुत्तनी
वडील :सर्वपल्ली वीरस्वामी
पत्नी :सिवकामू
आईचे नाव :सीताम्मा
मुले :सर्वपल्ली गोपाळ
मृत्यू :१७ एप्रिल १९७५
       डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञ होते. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व्हावेत हा एक योगायोग होता. ज्याची विवेकबुद्धी तांच्या राजकारणावर कधी कधी मात करते असे राजकीय इतिहासातील राधाकृष्णन हे एक उदाहरण होय. राजेंद्र प्रसाद हे सात्त्विक, सज्जन, चरित्र्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते. प्रत्यश्यात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते. पण सर्वेपल्ली राधाकृष्णन यांची परिस्थिती याहून वेगळी होती. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्याच्या जीवनात नव्हत्या. महात्मा गांधीशी त्याचे सबंध होते. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्त्वज्ञान प्रसिद्ध होती. स्वातंत्रोदय काळी कॅगर्स पक्षाचे नेते राधाकृष्णन ह्यांच्याकडे गेले. त्यांना संविधानसभेचे सदस्य होण्यासाठी पाचरण केले. त्यांना तत्त्वज्ञान मार्गदर्शनाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापुर्वी काही वर्ष ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापींठाचे ते कुलगुरू होते. प्रशासन त्यांनी यशस्वीपणे सांभाळले होते.

👉सुरुवातीचे जीवन

   डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेज मधून पदवीत्तर शिक्षण घेतले

👉 शैक्षणिक कारकीर्दी

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ - १९२१ दरम्यान काम केले. म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला.

१९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.

राधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.

कोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉ. राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत.


ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे २० वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९३६ - १९५२) विद्यासन निर्माण केले.


👉राजकीय कारकिर्दी


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दी मध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते १३ मे १९५२ - १२ मे १९६२ पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने १९५४ साली त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांना गौरविले.

त्याचप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ - १३ मे १९६७) होते.


👉शिक्षक दिन 


भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते.

चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही.

ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्टा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.

एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता.

संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअर, कोलारीज, ब्राउनिंग, वॊल्ट विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखन शैलीचा त्यांनी अभ्यास केला. तसेच गटे, डानटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी अनुभवली. त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.


👉 विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा खरा हाडाचा शिक्षक


इ. स. १९४२ साली चलेजाव’चा ठराव झाला. देशात क्रांतीचे वारे वाहू लागले. सभा होऊ लागल्या. मिरवणुका निघू लागल्या. महाविद्यालयीन तरुण विद्यार्थ्यांचे सळसळते रक्त त्यांना स्वस्थ बसू देईना. क्रांतिपर्वात त्यांचा सहभाग लक्षणीय होता. इंग्रज सरकार अशा क्रांतिकारकांना मारत असत आणि पकडून जेलबंद करीत असे. या गोष्टींपासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् प्रयत्नशील असत. विद्यार्थ्यांना यापासून परावृत्त करण्यात त्यांना यश आले नाही, तरी ते विद्यार्थ्यांवर कधीच रागावत नसत. उलट त्यांना त्रास होऊ नये म्हणून सतत त्यांच्याबरोबर राहत असत.

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विद्यापीठात मार्शल लॉ’ लागू करून विद्यापीठ ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. आणीबाणी लक्षात घेऊन डॉ. राधाकृष्णन् यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना तातडीने आपापल्या घरी परत जाण्याचा आदेश दिला. जाण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणून जमा रकमेतून पैसे तातडीने मिळण्याची सोयदेखील केली.

पुढे दुसरे महायुद्ध सुरू झाले. दक्षिण भारतातील विशाखापट्टण, काकीनाडा या बंदरांवर बॉम्ब फेकण्यात आले. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. असुरक्षित असल्याने विद्यार्थ्यांच्यात भीती निर्माण झाली. विद्यार्थी घरी जाण्याची इच्छा व्यक्त करू लागले. तेव्हा डॉ. राधाकृष्णन् यांनी सर्व विद्यार्थ्यांची तातडीची सभा बोलावली आणि त्यांना तुम्ही इथेच कसे सुरक्षित आहात, हे पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती पळाली व डॉ. राधाकृष्णन् यांच्यावरील त्यांचा विश्वास वाढला.


👉डॉ. राधाकृष्णन् यांचे तत्त्वज्ञान – डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार

तत्त्वज्ञान समजण्यास कठीण. आचरणात आणणे त्याहूनही कठीण. डॉ. राधाकृष्णन् म्हणतात,

  • ज्या अमूर्त व अदृश्य पायावर संस्कृतीची इमारत उभी असते, तो पाया म्हणजे तत्त्वज्ञान.
  • इतरांकडे बघताना स्वत:चेच प्रतिबिंब पाहण्यास शिकणे, ही गोष्ट फार अवघड आहे. परंतु अशी सवय झाली, तर इतरांबरोबर जीवन घालविणे सहज शक्य होईल.
  • ज्यांच्या अंगी त्याग आणि सेवावृत्ती आहे, तेच खरे साधू व तेच खरे संत.
  • देव, देश व मानव यांची सेवा करताना जो सर्व काही देतो, तो कृतार्थ होतो. त्यागातच खरे वैभव आहे. संचयात नाही.
  • अत्यंत पापी माणसालासुद्धा पश्चात्तापाने व श्रद्धेने उज्ज्वल भविष्यकाळ लाभतो.
  • शरीर, मन व आत्मा या तीनही वस्तू मिळून एक अविभाज्य अशी वस्तू बनली आहे अन् तिचे नाव आहे संस्कृती.
  • जी व्यक्ती सदाचरणी आहे, त्याच व्यक्तीमध्ये परमेश्वराचा अंश असतो.
  • समाजाचे स्वराज्य म्हणजे लोकशाही. लोकशाही नुसती राजकीय सोय नसून मानसिक प्रवृत्ती आहे.
  • मानवाचे आध्यात्मिक ध्येय म्हणजे परब्रह्माचा आत्मसाक्षात्कार करून घेणे, हे आहे. नुसते ऐहिक वैभव उपभोगणे नव्हे.
  • आपण पक्ष्याप्रमाणे विहार करावयास शिकलो, माशाप्रमाणे पाण्यात तरंगावयास शिकलो; परंतु अद्याप माणसांप्रमाणे जगात वावरण्यास शिकलो नाही.
  • असा हा भारतीय संस्कृतीचा उपासक म्हणजे भारतमातेचा लाडका सुपुत्र राष्ट्रपतिपदावरून निवृत्त होताच मद्रासला गेला आणि अखंड वाचन लेखनात मग्न झाला, संपूर्ण जीवन ज्ञानयज्ञासाठी समर्पित केले आणि कृतार्थ जीवन जगले.

२४ एप्रिल १९७५ रोजी डॉ. राधाकृष्णन् अनंतात विलीन झाले. ते देहाने या देशात, जगात नसले, तरी त्यांच्या ग्रंथांतील तत्त्वज्ञानाने अमरच राहतील.

मरावे परि कीर्तिरूपी उरावे. या रामदासांच्या उक्तीप्रमाणे ते कीर्तिरूपाने आपल्यातच आहेत.


संकलन श्री सुनिल नरसिंग राठोड

Post a Comment

0 Comments