कोणतीही कार्यशाळा असो , पालकांच्या प्रत्यक्ष भेटी - गाठी असो किंवा पालकांचे ई - मेल्स असोत अथवा , फोन असोत ... वारंवार विचारला जाणारा एकमेव प्रश्न म्हणजे , " मुलांच मोबाईल फोनचं वेड कसं रोखायचं ? " मुलांचा मोबाईलचा हट्ट जेव्हा पराकोटीला पोहोचतो , तेव्हा एखादी दुर्घटना घडते किंवा मुलं टोकाचे पाऊल उचलतात आणि अनेक पालकांच्या मनात धस्स होतं . कारण त्यांचीही मुलं मोबाईलसाठी प्रचंड हट्ट करत असतात . मोबाईल हे एका कुटुंबाचं वेड राहिलेलं नसून ते आता सामाजिक वेड झालेलं आहे . मोबाईलमुळे मुलांचं नुकसान होतं हे खरं ; पण फक्त मुलांचं नुकसान होतं , हे खरं नव्हे ! तर पालकांचंही नुकसान होतं .
सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालक सतत मोबाईलवर असल्यामुळे पालकत्वाचंही नुकसान होतं . आज अनेक ठिकाणी नोकरदार माणसं कामाच्या ठिकाणीसुद्धा बराच वेळ मोबाईलवर टाइमपास करताना दिसतात . मी कॉर्पोरेट ट्रेनर असल्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये , आस्थापनांमध्ये जाऊन जेव्हा प्रशिक्षण करतो , तेव्हा तेथेही मोबाईलमुळे उत्पादकता मंदावल्याचं व्यवस्थापन सांगत असतं . याचा अर्थ मोबाईल फोनच्या अतिवापराचा मुलांच्या अभ्यासावर जसा परिणाम होतो , तसा एकूणच सामाजिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम झालेला दिसतो . एखादी गोष्ट सामाजिक असते , तेव्हा ती मुलांपासून वेगळी काढता येत नाही . मुलंसुद्धा त्याची शिकार होणं , हे अपरिहार्य असतं . म्हणून आपल्याला मोबाईलचा आपल्या आयुष्यातला रोल नेमका काय आहे , किती आहे , त्याचे लाभ कोणते आहेत , मोबाईलचे तोटे कोणते आहेत , याचा विचार करावाच लागेल . मोबाईल ही फेकून देण्याची किंवा लपवून ठेवण्याची गोष्ट नव्हे .
आजच्या , विशेषतः कोरोनानंतरच्या काळात तुम्ही मुलांना मोबाईलपासून वंचित ठेवू शकत नाही , ही वस्तुस्थिती आहे . मोबाईलबद्दल आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे . अर्थात मला अनेक घरं अशीही माहिती आहेत की , त्या घरांमध्ये पालकांनी मुलांना मोबाईल दिलेला नाही आणि मुलांचंही मोबाईलवाचून काही अडलेलं नाही . त्या घरांमध्ये मुलांनी हट्ट केला नसेल , असं नव्हे ; परंतु कालांतराने त्यांनी तो हट्ट सोडून दिला आहे . म्हणजे काही मुलं ही मोबाईलशिवाय व्यवस्थित राहू शकतात . याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पालक त्यांना कन्व्हिन्स करू शकले आहेत , की मोबाईल हे तुझ्या वयाला साजेसं साधन नाही . जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तू माझा किंवा घरातला अतिरिक्त मोबाईल वापर ; पण मी तुझ्यासाठी वेगळा मोबाईल घेणार नाही ... पालकांची कन्व्हिन्सिंग पॉवर अर्थात मुलांना नीट समजावून सांगण्याची हातोटी ही खूप महत्त्वाची असते .
अनेक पालक मुलांना समजावून सांगत नाहीत . ते त्यांच्यावर खेकसतात . मुळात मुलांच्या भूमिकेत जाऊन मोबाईलचा विचार करणे ही पालकत्वाची गरज आहे ... सर्वप्रथम आपण हे मान्य केलं पाहिजे , की मोबाईल हे मनाला भुरळ घालणारे साधन आहे . त्यात व्हिडीओ बघता येतात , संगीत ऐकता येतं , गाण्याचा आनंद लुटता येतो , चॅट करता येतं . त्यात इंटरनेट आहे . एकमेकांना मेसेज पाठवण्याचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत . सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे गेम्स आहेत . त्यात घड्याळ आहे . त्यात गजर आहे . त्यात रिमाइंडर आहे ... हे काही नमुने झाले . यापेक्षाही अनंत गोष्टी मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत . केवळ काही बोटं वापरली की एक अद्भुत जग तुम्हाला खुलं होतं आणि तुम्ही त्या जगाचे होऊन जाता . आजूबाजूचे भान पूर्ण विसरायला लावणं ही मोबाईलची स्ट्रेंथ आहे . मुलांना मोबाईलचं आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे , हे प्रथम आपण मान्य करू या .
मोबाईलच्या महासागरात आज अनेक पालकही गटांगळ्या खाताना दिसतात . मग त्यांच्या मुलांच्याही नाका - तोंडात पाणीगेलं , तर ते कसं टाळता येईल ? मोबाईल हाताळताना मुलं त्यांच्या सीमा ओलांडतात आणि भलत्या प्रांतात प्रवेश करतात , हा खरा चिंतेचा मुद्दा आहे . मोबाईलवर जितकं चांगलं उपलब्ध आहे , तेवढेच वाईट , बीभत्स , अश्लील , हिंसकसुद्धा उपलब्ध आहे . आपली मुलं त्या अंधाऱ्या आणि भयंकर विश्वात जाऊ नयेत , हा पालकांचा आटापिटा असतो . मोबाईलमधले अनेक गेम्स असे आहेत , की जे जीवघेणे ठरले आहेत . व्यसनाप्रमाणे मुलं त्या गेम्सच्या अधीन झाल्यामुळे अभ्यासाचं प्रचंड नुकसान झालं आहे .... म्हणजेच मोबाईलची काळी बाजू टाळणं , मोबाईलचे दुष्परिणाम टाळणं याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे .
मोबाईल टाळण्याकडे नव्हे ! मोबाईल हे आजचं वास्तव आहे आणि त्याची हाताळणी कशी करायची , याचं प्रशिक्षण ... याचे संस्कार मुलांना देणं यात खरं शहाणपण आहे . मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे , हे एकदा गृहीत धरलं , की त्याचं व्यवस्थापन कसं करायचं , हे स्वतः शिकणं पालकांसाठी महत्त्वाचं आहे . घरात बसून पालक जेव्हा अमर्याद वेळ मोबाईलवर असतात , तेव्हाच मुलांमधल्या मोबाईलच्या व्यसनाची बीजं पेरली जातात . अत्यंत लहान वयात मुलं हे पाहतात , की ते जिथे जिथे जातात तिथे तिथे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि ती व्यक्ती मोबाईलवर व्यग्र असते ... मोबाईलवर रंगून गेलेली असते ... मग त्यांची पहिली गाठ पालकांच्या मोबाईलची पडते . त्यातून त्यांना मोबाईलबद्दल कुतूहल वाटायला लागतं . शाळेत किंवा क्लासमध्ये काही मुलांकडे ते मोबाईल बघतात . स्वाभाविकच मोबाईलचा संसर्ग त्यांनाही जडतो ...
मोबाईल हे एक वादळ आहे आणि या वादळापासून आपलं घर सुरक्षित ठेवायचं आहे , हे आपल्याला मान्य असेल तर मग आपलं घर तितकं मजबूत असायला नको का ? आपल्या घरामध्ये मोबाईलला पर्यायी मनोरंजनाच्या , व्यस्ततेच्या व्यवस्था असायला नकोत का ? आपण मोबाईलवर अवलंबून राहायचं आणि मोबाईल नुकसान करतोय असं म्हणायचं , या विरोधाभासाला अर्थ नाही ! एखादी घातक गोष्ट मुलांच्या हातात देताना आपण डोळ्यात तेल घालून पाहत असतो , की त्या गोष्टीपासून मुलांना नुकसान होऊ नये . मोबाईलच्या बाबतीतसुद्धा तेच आहे . मुलं जाणतीहोईपर्यंत मुलं मोबाईलवर काय बघतात , त्यांनी काय बघायला हवं , त्यांनी कशातून आनंद मिळवायला हवा , अभ्यासासाठी अवांतर ज्ञानासाठी मोबाईलचा कसा उपयोग होतो , कम्युनिकेशन स्किल्स किंवा अन्य कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी मोबाईल किती उपयुक्त आहे , अभ्यासाच्या आकृत्या , अतिरिक्त माहिती ही मोबाईलमधून कशी मिळते , याकडे पालकांचा कल असायला हवा .
आज अशी अनेक ऍप्स आहेत जी सर्वस्वी शैक्षणिक आहेत आणि मनोरंजकही आहेत . त्यातून मुलांचं ज्ञान , कुतूहल , आवड वृद्धिंगत होते . अशी अॅप्स पालकांनी सर्वप्रथम शोधली पाहिजेत . स्वतः पाहिली पाहिजेत आणि मुलांनी पाहावी , म्हणून प्रयत्न केले पाहिजेत . मुलांना हातात मोबाईल हवा असतो ; परंतु मुलांनी मोबाईलवर काय बघायचं , हे आपण ठरवायला हवं . म्हणजे मग मुलंही ती गोष्ट हळूहळू मान्य करतात . यामध्ये पालकांचे सुपरविजन , पालकांची काटेकोर देखरेख ही खूप महत्त्वाची आहे . आणि तेच सर्व समस्यांचे मूळ आहे ! कारण पालकांना वेळ नाही , म्हणून ते आधी स्वखुषीने मुलांच्या हातात मोबाईल सोपवतात आणि स्वतः कुठल्यातरी कामात व्यग्र होतात ......
हे टाळायलाच हवे...
मोबाईलचे तोटे जितके आहेत तितकेच त्याचे फायदेही आहेत , याकडे दुर्लक्ष करता कामा नये . मोबाईलचा स्वीकार आपण डोळसपणे करायला हवा . मोबाईलवर राग काढून • उपयोग नाही . कारण मोबाईलच्या हाताळणीत त्याच्या समस्या दडल्या आहेत . मोबाईल हे एक हार्डवेअर आहे . त्यातलं कोणतं सॉफ्टवेअर पसंत करायचं , कशाला प्राधान्य द्यायचं , हे पालकांच्या हातात आहे . पालकांनी मोबाईलचा शत्रू म्हणून तिरस्कार न करता , मित्र म्हणून स्वीकार करण्यात पालकांचं आणि मुलांचं हित आहे . एकदा मोबाईलचा वापर हा सकारात्मक व्हायला लागला , की त्याची व्यसनाधीनताही आपोआप कमी होते आणि दुष्परिणाम संभवत नाहीत किंवा त्यांची तीव्रता ओसरते . मोबाईलशी मैत्री करणे मोबाईलमधल्या सकारात्मक सॉफ्टवेअरशी ओळख करून घेणे , हाच यावरचा रामबाण उपाय आहे !
संकलन- श्री राठोड सुनिल नरसिंग
सौजन्य -संजीव लाटकर ,sanjeevlatkar@hotmail.com सकाळ👍
0 Comments