डॉ. सलीम अली : (१२ नोव्हेंबर १८९६-२० जून १९८७)

 


          डॉ. सलीम अली : (१२ नोव्हेंबर १८९६-२० जून १९८७). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षितज्ञ. भारतीय उपखंडातील पक्ष्यांच्या निरिक्षणासाठी आखलेल्या विविध अभ्यास मोहिमा, दुर्मिळ पक्ष्यांचे लावलेले शोध, तसेच पक्ष्यांसंबंधी लिहिलेले अनेक गंथ यांकरिता सलीम अली प्रसिद्ध आहेत. त्यांचे कार्य पक्षिविज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा समजला जातो. सलीम अली यांचा जन्म मुंबई मध्ये मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला.


            त्यांचे पूर्ण नाव सलीम मोइनुद्दीन अब्दुल अली असे होते. ते एक वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे व त्यानंतर दोन वर्षांनी आईचे निधन झाले. त्यांचे मामा अमीरूद्दीन तय्यबजी यांनी त्यांचा सांभाळ केला. ते नऊ भावंडांत सर्वांत धाकटे होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गळ्यावर पिवळा डाग असलेली चिमणी पाळावयास विकत घेतली. त्यांना तो पक्षी कोणता हे ओळखता येत नव्हते, म्हणून ते मामांचे शिफारस-पत्र घेऊन मुंबईतील बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांना या पक्ष्याची सर्व माहिती मिळाली. यानंतर त्यांना पक्षी निरीक्षणाचा छंद लागला.

       डॉ सलीम अली १९१३ मध्ये मुंबई विदयापीठातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी सेंट झेव्हियर महाविदयालयातून प्राणिविज्ञान विषयाची बी.ए. ऑनर्स ही पदवी संपादन केली. ही पदवी विदयापीठाच्या पदवीच्या समकक्ष समजली जात नव्हती, त्यामुळे त्यांना भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेत नोकरी मिळू शकली नाही. त्यांची बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीत मार्गदर्शक व्याख्याता या पदावर नियुक्ती झाली. दोन वर्षांनी ते पुढील प्रगत अभ्यासासाठी जर्मनीला बर्लिन विदयापीठात गेले (१९२९). 

     विद्यापीठात त्यांना प्रसिद्घ पक्षितज्ञ एर्व्हिन श्ट्रेझमान यांचे मार्गदर्शन मिळाले. तेथे सलीम अली यांनी पक्ष्यांचे वर्गीकरण, शरीररचनाशास्त्र, पक्ष्यांची कातडी काढणे, त्यात पेंढा भरून पुन्हा शिवणे, पक्ष्यांची मोजमापे घेणे यांचा अभ्यास केला. १९३१ साली ते भारतात परत आले. बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे ते उपकार्यवाह व नंतर अध्यक्षही होते.

     बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या मदतीने सलीम अली यांनी हैदराबाद राज्य पक्षिनिरीक्षण, त्रावणकोर-कोचीन पक्षिसर्वेक्षण, अफगणिस्तान पक्षिसर्वेक्षण, कैलास मानसरोवर पक्षियात्रा अशा पक्षिअभ्यासाच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. या मोहिमेत त्यांना लोक वॉन थो या छायाचित्रकार मित्राची मदत झाली. या पक्षिनिरीक्षण मोहिमेचे सलीम अली यांनी लिहिलेले अहवाल मार्गदर्शक समजले जातात.

      डॉ. सलीम अली यांनी सुगरण (बाया) पक्षी घरटी कशी बांधतात, त्यांच्या विणीच्या हंगामातील सवयी यासंबंधी विशेष अभ्यास केला. त्यांनी नोंदी, रेखाटने, छायाचित्रे यांचा वापर करून बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या नियतकालिकात सुगरण पक्ष्यावर लेख प्रसिद्ध केला. जॉन हॅरेल कुक या पक्षितज्ञांच्या मदतीने त्यांनी हिमालयातील कुमाऊँ तराई भागात 'फिन्स बाया' पक्षी पुन्हा शोधून काढले. 

         कच्छमधील हंसक (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या वसाहतीचा त्यांनी शोध लावला. लडाखमध्ये काळ्या मानेचा सारस (केन्स) असल्याचे त्यांनी १९७६ मध्ये दाखवून दिले. माळढोक या पक्ष्याचे निवासस्थान, त्याच्या सवयी यासंबंधी सविस्तर माहिती त्यांनी मिळविली. स्थलांतरित पक्ष्यांमुळे स्थानिक पक्षिजीवनात कोणते बदल घडून येतात,मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या जीवनात कोणता अडथळा येतो, पक्ष्यांचे वर्तन या गोष्टींच्या अभ्यासावर त्यांचा भर होता.

      डॉ. सलीम अली यांनी ‘ इंडियन बोर्ड ऑफ वाइल्ड लाइफ ’ची स्थापना करण्यासाठी भारत सरकारकडे आग्रह धरला होता. या मंडळाची स्थापना झाल्यावर ते त्याचे सस्य होते. त्यांच्या प्रयत्नातून भारतात केवलादेव घाना, चित्रस, पॉईंट कॅलीमर, हरिके लेक ही पक्षीद अभयारण्ये निर्माण झाली. १९७७ मध्ये त्यांनी सायलेंट व्हॅलीच्या रक्षणासाठी जागृत मोहिम हाती घेतली व तीत त्यांना यश मिळाले. 

        डॉ सलीम अलीनी केंद्र शासनाकडे पर्यावरण खाते सुरू करावे यासाठी आग्रह धरला. त्यानुसार शासनाने पुढे पर्यावरण हे स्वतंत्र खाते सुरू केले. सलीम अली यांनी पेन्सिल, कागद, संयम आणि दुर्बिण एवढ्या साधनांच्या जोरावर पक्षिविज्ञानाची जोपासना केली, असे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ जॉन बर्डन सांडर्सन हॉल्डेन यांनी म्हटले आहे.

      डॉ सलीम अली यांनी लिहिलेल्या द बुक ऑफ इंडियन बर्ड्‌स, (१९४१) या गंथाच्या अकरा आवृत्त्या निघाल्या. त्यांनी द बर्ड्‌स, ऑफ कच्छ, इंडियन हिल  बर्ड्‌स, (१९४६), द बर्ड्‌स, ऑफ त्रावणकोर-कोचीन, द बर्ड्‌स, ऑफ सिक्किम, ए फिल्म गाईड टू द बर्ड्‌स, ऑफ द ईस्टर्न हिमालयाज, पिक्टोरियल गाईड टू द बर्ड्‌स,ऑफ इंडिया अ‍ॅड सबकाँटिनेंट ही निरनिराळ्या प्रदेशांतील पक्ष्यांसंबंधी पुस्तके लिहिली. 

       डॉ सलीम अली व  स्मिथसोनियन इन्स्टिटयूशनमधील सिडनी दिलन रिप्ली यांनी द हँडबुक ऑफ बर्ड्‌स, ऑफ इंडिया अँड पाकिस्तान हा दहा खंडांचा गंथ लिहिला (१९६८-७४). या गंथात पक्ष्यांचा गट, जात, उपजात, आकार, रंग यांची सचित्र माहिती दिलेली आहे. सलीम अली यांनी लिहिलेले द फॉल ऑफ ए स्पॅरो (१९८५) हे आत्मचरित्र पक्षी निरीक्षकांना उपयुक्त आहे. बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या हॉर्नबील मासिकपत्रिकेत त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले.

      डॉ सलीम अली यांना प्राणिविज्ञान विषयीच्या संशोधनासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेचे जॉयगोविंद लॉ सुवर्णपदक (१९५३), ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट्स युनियन संस्थेचे सुवर्णपदक (१९६७), इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमीचे सुंदरलाल व्होरा मेमोरियल मेडल (१९७०), रशिया अ‍ॅकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सचे पावलोव्हस्की सेंचनरी मेमोरियल मेडल (१९७३), नेदर्लंड्सचा ऑफिसर इन द ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क किताब (१९७३), इंटरनॅशनल जे. 

       पॉल गेट्टी प्राईझ फॉर वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन (अमेरिका, १९७६), इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमीचे सी. व्ही. रामन पदक (१९७९), भारत सरकारचा वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशनबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार ( सुवर्णपदक १९८३), नेदर्लंड्सचा क्रमांडर इन द ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क किताब (१९८६), जागतिक वन्य प्राणी निधीतर्फे ‘ स्कॉल ऑफ ऑनर ’ (१९८७), निसर्ग  आणि वन्य जीव यांच्याविषयी प्रेम निर्माण केल्याबद्दल दादाभाई नौरोजी पारितोषिक (१९८७) असे अनेक मानसन्मान मिळाले. 

         त्यांना अलिगढ विदयापीठाने १९५८ मध्ये आणि आंध विदयापीठाने १९७८ मध्ये सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली. ते भारतातील नेचर क्लब ऑफ इंडिया चळवळीचे संस्थापक होते. १९८४ साली औरंगाबाद येथे झालेल्या पक्षिमित्र संमेलनात ते प्रमुख पाहुणे होते. 

       भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (१९५८) व पद्मविभूषण (१९७६) हे किताब दिले, तसेच त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली (१९८५), ‘ पक्ष्यांच्या सान्निध्यात ’ हा त्यांच्यावरील दूरदर्शन लघुपट १९८३ साली काढण्यात आला. तमिळनाडू राज्यात कोईमतूर येथे त्यांच्या नावाने द सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्टरी ( SACON ) ही संस्था सुरू करण्यात आली आहे. गोवा राज्यात चोडण बेटावरील ‘ डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य ’ पक्षी निरीक्षकांना आकर्षित करीत राहिले आहे. त्यांचा मृत्यू मुंबई येथे 20 जून 1987 साली झाला. 

Post a Comment

0 Comments